तालुक्यातील शेतकरी करत आहेत जलसंकटाचा सामना, काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी
रमेश लिंबोरे
पैठण (प्रतिनिधी): तालुक्यातील ५५ गावांना वरदान ठरणाऱ्या ब्रह्मगाव लिफ्ट सिंचन योजनेचे कामास २००९ ला सुरुवात झाली आहे परंतु गेल्या १७ वर्षापासून या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असून दिवसेंदिवेश शासनाच्या तिजोरीवर बोजा पडत आहे. पैठण तालुक्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ब्रह्मगाव लिफ्ट योजनेचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेचे काम वेळेत पूर्ण झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच दुष्काळ परिस्थितीतमजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील वाहेगाव, नारायणगाव, रहाटगाव, करजखेडा, सोलनापूर, वडजी या गावांपर्यंतचे चाऱ्यांचे (कालव्यांचे) तसेच पुलांचे काम अद्याप अपूर्ण आहे. तसेच वाहेगाव जवळ एक ते दिड किलोमीटर चे काम अपूर्ण आहे त्यामुळे योजनेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. मध्यंतरी काही शेतकरी मोबदल्यासाठी न्यायालयात गेले होते.
परंतु त्यांचा प्रश्न मिटला असून हर्षी जवळ पुन्हा अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे यांनी दिली आहे. तसेच रहाटगाव पर्यंतच्या कामाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक ब्रह्मगाव लिफ्ट योजनेच्या कामाचे किती किलोमीटर पर्यंत टेंडर निघाले ते किती कोटीचे होते, कामाजी मुदत किती होती.
कोणत्या एजन्सी मार्फत काम सुरू आहे हे मात्र सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे. मध्यंतरी कॅनल द्वारे कासार, पाडळी, ववा वडाळा मार्गे पाणी खेर्डा प्रकल्पात सोडण्यात आले होते परंतु हा खेर्डा प्रकल्प ही सध्या कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची तीव्रतांच्या निर्माण झाली आहे.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पावसाळ्यापूर्वी ब्रह्मगाव लिफ्ट योजनेचे उर्वरित काम पूर्ण झाल्यास अनेक गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी मागणी डॉ. सुनील शिंदे यांनी केली आहे.















